रत्नागिरी (आरकेजी): समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात घ्यावयाच्या सुरक्षेचा संदेश देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलामार्फत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आहे असे डेप्युटी कमांडट करुणाकरन यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड पोलीसस्थानक सभागृह येथे आयोजित मोटारसायकल रॅली कार्यक्रमाचे स्वागत करताना ते बोलत होते.
यावेळी भारती शिपयार्डचे कमांडट दिनेश कुमार, डेप्युटी कमांडट सुनिल चव्हाण, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. साळुंखे, जयगड पोलीस उपनिरीक्षक श्री. कांबळी, परवाना अधिकारी मत्स्यविभाग दिलीप जाधव, जयगड मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष तरबेज सोलकर, चंडिका मच्छिमार सोसायटी वरवडेचे ज्ञानेश्वर आंबेरकर आदी उपस्थित होते. डेप्युटी कमांडट करुणाकरन यांनी समुद्रकिनारी वास्तव्यास असणाऱ्या युवक युवतींना तटरक्षक दलामार्फत करण्यात येणाऱ्या भरती प्रकियेबाबत मार्गदर्शन केले. तसेच मच्छिमार बांधवानी आपल्या बोटीच्या नोंदणीची कागदपत्रे, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत देण्यात येणारे बायोमेट्रिक कार्ड, आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र आणि गोव्यातील पाच जिल्हृयामध्ये मोटारसायकल रॅलीचा प्रवास होणार असून सदर रॅलीच्या आयोजनामध्ये भारतीय तटरक्षक दलासह शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस, सीमासुरक्षादल आदींचा सहभाग आहे. मोटारसायकल रॅलीमध्ये १३ मोटारसायकल व २६ मोटारसायकलस्वारांचा समावेश आहे.