रत्नागिरी, 19 June : मान्सून सध्या कोकणात सक्रीय झाला आहे. गेल्या चार दिवसात कोकणात पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पाऊस दमदार बरसत असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
कोकणात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनच्या सरीनी दमदार सलामी दिली आहे. मान्सूनच्या जोरदार सरी सध्या कोकणात बरसतायत. त्यामुळे शेतात नांगरणीच्या कामांना वेगानं सुरुवात झाली आहे.कोकणातली शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या वेळापत्रकानुसार शेतीच्या कामांचं नियोजन करावं लागतं. जिल्ह्यात भात हे मुख्य पीक आहे. कोकणात मान्सुनपुर्व पावसाच्या सरींवर भाताची पेरणी केली जाते, तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडल्यावर पेरण्या केल्या जातात. पण पावसाने चांगली साथ दिल्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरलेलं धान्य उगवण्यास सुरुवातही झालीय. त्यामुळे बळीराजा आता शेतीच्या इतर कामांमध्ये मग्न झाला आहे. लावणी करण्याअगोदर शेतीची उखळ केली जाते, म्हणजे संपूर्ण शेत नांगरल जातं, काही ठिकाणी याला शेतीची फोड करणं असंही म्हटलं जातं. तर दुसरीकडे शेतात उगवलेले अनावश्यक तण काढण्यासाठी महिलाही शेतात दिसू लागल्या आहेत. सध्या पावसाने चांगली साथ दिल्याने शेतीच्या या कामांना वेग आला आहे. शेतीत यांत्रिकीकरण जरी झालं असलं तरी आजही पारंपारीक पद्धतीनं कोकणात अनेक ठिकाणी शेती केली जाते.