मुंबई : मोनॅको देशाचे भारतातील राजदूत पेट्रीक मेडेसिन यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव सतीश जोंधळे उपस्थित होते.
मेडेसिन यांनी मोनॅको देश छोटा असूनही पर्यावरणाबाबत जागरूक असल्याची माहिती आणि उपलब्ध जागेचा वापर करून समुद्र किनारे विकसित करीत असलेल्या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना माहिती दिली.
तसेच मोनॅको देशाचे राजपुत्र दुसरे अल्बर्ट हे 4 आणि 5 फेब्रुवारीला दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. तेही पर्यावरणाचे अभ्यासक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या वाहतूक समस्या व समुद्र किनारा विकासाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पर्यावरणाबाबत भारतही खूप जागरूक आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात सौर उर्जेवर चालणाऱ्या बस येणार आहेत. 50 टक्के कार या इलेक्ट्रिक असणार आहेत. शिवाय नवी मुंबई आणि मुंबई परिसरात असलेल्या समुद्र किनाऱ्यांचा विकासही झपाट्याने सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मोनॅको देशाला तब्बल 7 मिलियन पर्यटक भेट देतात आपणही मोनॅकोला भेट द्यावी, अशी विनंती पेट्रीक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.