
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचाराचा ज्वर दिवसेंदिवस तापू लागला आहे. आज पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे रेनकोट घालून आंघोळ करतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी खिल्ली उडविली होती. हाच धागा पकडून उद्धव यांनी आपल्याच सरकारला तोंडघशी पाडले आणि मोदींंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.” ते तर रेनकोट घालून आंघोळ करतात. तुम्हाला तर बिनसाबणाचे बुडबुडे काढण्याची सवय आहे, त्यामुळेच देशाला बिनपाण्याची आंघोळ तुम्ही घातली,” असे उद्धव यांनी पंतप्रधानांना आज झालेल्या अंधेरीच्या सभेत सुनावले आणि मोदींनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच आहे, याचाही पुनरुच्चार केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते युती तुटली नसती तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. यावर, “युती तोडली नसती तर पप्पू कलानीसोबत माझा फोटो झळकला असता. नरेंद्र मोदी, अमित शहा, पप्पू आणि त्यांच्या बाजुला माझा फोटो लागला असता, असे शरसंधान उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर केले. केवळ सत्ता मिळवण्यासाठी भाजपा कुणाशीही हातमिळवणी करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.