पणजी : गोवा या राज्यामुळेच देशाला कणखर संरक्षणमंत्री लाभले आहेत, मी या राज्याचे आभार मानतो. कारण या राज्याने देशाला दिलेल्या संरक्षणमंत्र्यामुळे आज संपूर्ण जग सर्जिकल स्ट्राईकवर चर्चा करत आहे, असे कौतुक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहर पर्रीकर यांचे केले. एका सभेला संबोधीत करताना ते बोलत होते.
अनेक माणसे अजूनपर्यंत सर्जिकल स्ट्राईकवर अभ्यास करत आहेत. भारतीय सैनिक तिथपर्यंत कसे पोहोचले असतील? मी सांगितले, मी लाहोरला पोहचलो, दिवसा तेथे गेलो. पण जग अजूनही विचार करतेय की मी तेथे कसा पोहोचलो. एकदा का एखादी गोष्ट करायची असे भारताने ठरविले की, आपले सैनिक पराक्रम दाखवणारच, अशी भारतीय सैनिकांची प्रशंसादेखील पंतप्रधानांनी केली.
सरकार गरिबांसाठी आहे आणि भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करत आहे, असा विश्वास मोदी यांनी दिला. आम्ही संपूर्ण देशात भ्रष्टाचाराविरोधात मोहीम उघडली आहे. सामान्य माणूस काळे धन कमावत नाही तर श्रीमंत माणसे भ्रष्टाचारात सहभागी आहेत. हीच माणसे माझ्यावर निशाणा साधत आहेत, कारण माझ्यामुळेच त्यांची गैरसोय झाली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
त्या लोकांनी मागील ७० वर्षात जे जमा केले, ते नष्ट करण्याचे काम मी करत आहे. गरिबी कायमस्वरूपी जावी, यासाठी महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. त्यासाठी कदाचित आमाची धोरणे तुम्हाला कडक वाटतील परंतु ती देशाच्या कल्याणासाठी असतील, असे मोदी यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारमुक्त देशासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.
गरीबी आणि भ्रष्टाचार निर्मूलनावर बोलण्याची फॅशन सध्या देशात आली आहे. पण जेव्हा तुम्ही यावर बोलता, तेव्हा हीच लोक तुमच्याविरोधात बोलायला तयार असतात, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकात कॉंग्रेस मंत्र्याच्या घरात काळा पैसा, नवीन नोटा आणि सोने मिळून सुमारे १५० कोटींची मालमत्ता सापडली. याचे कर्नाटक सरकारला काहीही घेणेदेणे नाही, त्यांनी त्या मंत्र्याचा राजीनामासुद्धा घेतलेला नाही. तसेच कारणे दाखवा, अशी नोटीसदेखील बजावलेली नाही, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.