नवी दिल्ली : विद्यार्थी आणि पालकांनी परिक्षांकडे ताण म्हणून नाही तर उत्सव म्हणून पहावे. ताणरहित दृष्टीकोनामुळे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास परीक्षा केंद्रात त्यांना मदतीचा ठरतो. परीक्षा हा जीवन मरणाचा प्रश्नही नाही तसेच यशाचे मूल्यमापन करण्याचा निकषही नाही. त्यामुळे परीक्षांच्या काळात संपूर्ण कुटुंबात तणावाचे वातावरण नसले पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना केले.
इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करा, असे पंतप्रधान म्हणाले. पालकांनी स्वीकार, शिकवणे आणि वेळ देणे या तीन गोष्टींवर भर देण्याची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांना जसे आहे तसे स्वीकारावे कारण अपेक्षा हे अनेक प्रश्नांचे मूळ असते. पालकांच्या अपेक्षांचे ओझे हे अनेक वेळा शाळेच्या दप्तराच्या ओझ्यापेक्षाही अधिक असते असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी योग्य आराम , झोप आणि शारीरिक हालचाली हे महत्वाचे घटक आहेत. पुस्तक आणि परीक्षांचे निकाल याव्यतिरिक्तही जग असल्याचे त्यांनी सांगितले. ध्येय पूर्तीची संकल्पना आणि महत्वाकांक्षा यांच्यातील सुयोग्य ताळमेळ म्हणजेच आयुष्य असल्याचे ते म्हणाले. गुणांमागे धावण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कौशल्य मिळवावे आणि आत्मविश्वास आणि निर्धार विकसित करवा असेही त्यांनी सांगितले.
हक्क आणि कर्तव्य हि लोकशाहीची दोन चाके असून नागरिकांनी त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांकडे अधिक लक्ष पुरवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. नागरिकांची हक्क आणि कर्तव्य याबाबत सखोल चर्चा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
शौर्य पुरस्काराने सन्मानित वीर जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या युवकांनी शौर्य पुरस्कार विजेत्यांची गाथा जाणून घेऊन त्यांच्या या शौर्याचा प्रसार करावा असे आवाहन पंतप्रधानीं केले. जम्मू आणि काश्मीर मधील हिमस्खलनात मृत्यू पावलेल्या जवानांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.
१ फेब्रुवारी रोजी ४० वर्षे पूर्ण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाने देशाप्रती केलेल्या सेवेबद्दल त्यांनी आभार मानले आणि तटरक्षक दल हे जगातील सर्वोत्तम 4 दलांपैकी असल्याबद्दल अभिमान त्यांनी व्यक्त केला.