
विक्रोळीत कोणतीही नागरी समस्या निर्माण झाली की त्याच्या सोडवणुकीसाठी जयंत दांडेकर यांचे नाव पूढे येते. तेही तत्परतेने समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. पहाटेपासून त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात होते. अनेक लोकं त्यांच्या कार्यालयात समस्या घेऊन येत असतात. यानिमित्ताने त्यांची घेतलेली मुलाखत….
कन्नमवार नगरमध्ये तुम्ही किती वर्षांपासून राहता? बदलत्या कन्नमवार नगराविषयी तुमचे मत काय?
जयंत दांडेकर : कन्नमवार नगर मध्ये गेली 50 वर्ष राहत आहे. पुनर्विकास व्हायला पाहिजे हे नक्की, पण त्यामुळे ज्या इमारतीत रहिवाशी राहतात त्यांच्या समस्या खूप जास्त प्रमाणात यामुळे वाढल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
या नगरासाठी तुम्ही अनेक आंदोलने केलीत? एखाद्या आंदोलनाच्याबाबत आठवण सांगा?
जयंत दांडेकर : कन्नमवार नगरसाठी अनेक आंदोलन केली. डम्पिंग विरोधात,विक्रोळी पूर्व ते पश्चिम उड्डाणपूल आंदोलन, रस्त्यावरील खड्डे, बेस्ट बस चालू ठेवण्याबाबत महागाईविरोधात बरीच आंदोलन केली.
लोकांसाठी आंदोलने करताना अंगावर कोर्ट केसेस पडतात? तुमच्यावरही अनेक केसेस आहेत?
जयंत दांडेकर : यासाठी 4-5 वेळा तुरुंगावास भोगला.13 राजकीय केसेस अंगावर आहेत. पण याची पर्वा करत नाही. समाजकारण आणि राजकारण यात काम करताना याबाबी गृहीत धरल्या गेल्या पाहिजेत.
नागरिक तुमचा उल्लेख जयंत दांडेकर तर नगरसेवक आहेत, असा का करतात? तुम्ही तर नगरसेवक नाहीत.
जयंत दांडेकर : हा नागरिकांचा मोठेपणा आहे कि ते मला एवढी मोठी पदवी देतात. मी तक्रारीच निवारण त्वरित त्या वेळीच करतो. समोर असलेल्या रहिवाशी यांच म्हणण ऐकून घेतो. सोडवणूक करण्याला प्राधान्य देतो.
कोरोना काळात तुम्ही कशा प्रकारे लोकांसाठी कार्य केले?
जयंत दांडेकर : कोरोना काळ हा संपूर्ण जगासाठी अतिशय भयंकर होता. या काळात रुग्णांना मनसे च्या वतीने रुग्णवाहीका, सॅनिटायझर, औषधं, मोफत धान्य वाटप केले. कोरोना मध्ये ज्या व्यक्ती मृत झाल्या होत्या त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून रुपये 50,000 हजारची मदत मिळवून दिली. मला स्वतः विषयी जास्त सांगायला आवडत नाही. तुम्ही कृपया इतरांना जाऊन विचारा, ते सांगतील.
विक्रोळीत कोणकोणत्या आधुनिक सुविधा हव्यात असे तुम्हाला वाटते?
जयंत दांडेकर : बेस्ट बसेस वाढायला हव्यात. सरकारी पण प्रशस्त रुग्णालय हवे. रस्ते चांगले हवेत. 24 तास पाणी हवे. जिमखाना असावा. प्रदूषणमुक्त हवे. कांजूर डम्पिंग ग्राउंड बंद झाले पाहिजे.
कन्नमवार नगरात कोणत्या प्रकारचे बदल हवेत? यासाठी तुम्ही कसे प्रयत्नशील आहात?
जयंत दांडेकर : बदल होत असताना कन्नमवार नगरचा वारसा जो विचारांचा आहे आणि आशिया खंडातली सर्वात मोठी वसाहत आहे. शैक्षणिक, क्रीडा, कला आणि साहित्य यांचा वारसा जपून योग्य प्रगतीकडे वाटचाल झाली पाहिजे. आम्ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो.
विक्रोळी रेल्वे स्थानक पूर्व बाजूला सोयीसुविधांचा अभाव आहे.
जयंत दांडेकर : हो याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. आंदोलनाशिवाय प्रशासन हलत नाही, हेही सत्य आहे.
विक्रोळी विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढवायला आवडेल का?
जयंत दांडेकर : याबाबत फक्त आमचे राजसाहेब ठाकरे निर्णय घेतात आणि माझी फक्त मनसेशी बांधिलकी आहे. साहेब देतील तो आदेश मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.
जय महाराष्ट्र!
मुलाखत : प्रशांत गायकवाड














