
टागोर नगरच्या राड्यात महाराष्ट्र सैनिकाला वाचविताना स्वतःच्या जीवाचा विचार न करता दोन हात करणाऱ्या विनोद शिंदे यांना विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून मनसेची उमेदवारी जाहीर झाली आहे. राज ठाकरेंच्या आदेशाला प्रमाण मानून कार्य करणाऱ्या विनोद शिंदे यांनी एका कार्यकर्त्याला वाचवताना स्वतःचे रक्त सांडले होते.
मला मार खाणारे नको तर मार देणारे कार्यकर्ते हवेत, असे राज यांनी म्हटले होते. हेच लक्षात ठेवून टागोर नगरच्या राड्यात विनोद शिंदे यांनी सेनापतीची भूमिका बजावली होती. राज यांनी एका प्रामाणिक कार्यकर्त्याची निवड केल्याबद्दल विनोद शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
काय घडले होते टागोर नगरात :
28 नोव्हेंबर 2017 रोजी टागोरनगर येथे मनसेच्या तीन जणांवर भ्याड हल्ला झाला होता. अनधिकृतपणे बसणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना समज देण्यासाठी ते गेले असता हा प्रकार घडला होता. यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. रात्रीचे साडे नऊ वाजले होते. मनसैनिकांवर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी सुमारे 70 जण रात्री नऊच्या सुमारास घुसले. मनसेचे विक्रोळी विभागप्रमुख असलेले विनोद शिंदे आणि मनसैनिकांना पाहून हल्लेखोर घाबरून पळून गेले. याचवेळी सर्वजण परत येत असताना मनसेच्या एका कार्यकर्त्याला दबा धरून बसलेल्या लोकांनी घेरले. याची खबर शिंदे यांना लागताच ते शेवाळे यांच्यासह त्याला सोडवायला गेले. त्यांनी त्या मनसैनिकाला घेराव्यातून सोडविलेही. याचवेळी ते स्वतः मात्र अडकले. चहुबाजुंनी त्यांच्यावर भ्याडपणे हल्ला करण्यात आला. लाठ्या काठ्यांनी प्रहार करून त्यांना जबर जखमी करण्यात आले. तरीही शिंदे यांचा जोश पाहून मारहाण करणारे पळून गेले. शिंदेनी स्वतःवर हल्ला झेलला पण त्या महाराष्ट्र सैनिकाचे प्राण वाचवले, याची आठवण आजही काढली जाते.
विनोद शिंदे हे मनसेचे विक्रोळी विभागप्रमुख आहेत. विविध सामाजिक कार्यातून त्यांनी ठसा उमटवला आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विक्रोळी विधानसभा मतदारसंघ मनसेकडे होता. यावेळी विनोद शिंदे उमेदवार आहेत. मराठीबहुल वसाहती येथे असल्याने मनसेने जोर लावल्यास विजय सोपा आहे, असे बोलले जात आहे.

















