मुंबई : विक्रोळीत लागोपाठ झालेल्या दोन घटनांमध्ये मनसेच्या एकूण पाच कार्यकर्त्यांवर आज रात्री भ्याड हल्ला करण्यात आला. पहिल्या घटनेत दुकानावर मराठी पाट्या लावा, अशी पत्रके वाटली म्हणून मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. टागोर नगर नंबर 2 येथे ही घटना घडली. या हल्ल्यात मनसेचे 3 कार्यकर्ते जखमी झाले. काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावरून 8 ते 9 जणांनी हल्ला केला, असा आरोप मनसेने केला आहे. या प्रकारामुळे विक्रोळीत तणाव पसरला आहे.
तर याच ठिकाणी पुन्हा काही वेळाने मनसेच्या दोन कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली. विभाग अध्यक्ष विनोद शिंदे आणि उपशाखाध्यक्ष उपेंद्र शेवाळे यांच्यावर हा हल्ला झाला. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
मनसेचे उपविभाग अध्यक्ष विश्वजीत ढोलम यांच्या डोक्यावर काठीने प्रहार करण्यात आला. यात ढोलम यांचे डोके फुटून 7 टाके पडले. तर संतोष देसाई, विजय येवले या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाली. त्यांना मोठ्या प्रमाणावर मुका मार लागला आहे. तिघेही पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मनसे कार्यकर्ते पत्रके वाटत होते. याचवेळी अचानक काहीजण आले आणि लाठ्या काठ्यांनी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला.
तणाव वाढू नये, यासाठी विक्रोळी पोलीस घटनास्थळी रवाना झाले. मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची तातडीने रुग्णालयात भेट घेतली. काँग्रेसचा स्थानिक नेता अब्दुल अन्सारीचाच यात हात आहे, असा आरोप त्यांनी केला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
दरम्यान, महात्मा फुले रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली.
.