मुंबई : मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ट्विटरवरून सल्ला दिला आहे. “सतत सकारात्मक बदल हे प्रगतीचे लक्षण असे राजसाहेब ठाकरे म्हणाले होते, तर मग या संकल्पनेची अंमलबजावणी पक्षात व्हायला हवी,” असा सल्लाच देशपांडे यांनी राज यांना दिला आहे.
राज यांच्या समोर बोलताना अनेक कार्यकर्ते, नेते यांची भंबेरी उडते. त्यामुळेच देशपांडे यांनी राज यांच्यासमोर बोलण्याऐवजी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी कृष्णकुंजवर बैठक मनसेच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर आज संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पक्षात फेरबदलांची मागणी केली आहे. त्यांनी पक्षांतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालिका निवडणुकांत दारूण पराभव झाल्यानंतर मनसेत कमालीची मरगळ आली आहे. ही मरगळ झटकण्यास पक्षाला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे पक्षात आता बदलाची मागणी जोर धरू लागली आहे.