मुंबई (रुपेश दळवी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिंडोशीतील मनसैनिकांशी नुकताच दिलखुलास संवाद साधला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसैनिकांना सक्षम करणा-या कार्यशाळा घेणे, अंगिकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मिळुन विभागातील समस्या सोडविणे, विभागात ‘स्पाय’ यंत्रणा राबविणे, जुन्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत घेत त्यांना एखादी विशेष जबाबदारी सोपविणे. कॉलेजच्या तरुणांपासून ते वरिष्ठ नागरिकांपर्यंत मनसेच्या प्रभावी कार्यशैलीची ओळख करून देणे, निवडणूकीदरम्यान पक्षाशी फितुरी करणा-यांची दखल घेणे अश्या पक्षवाढीसाठी आवश्यक संकल्पना मनसे कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने व्यक्त केल्या
बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, संजय चित्रे, सरचिटणीस रीटा गुप्ता, राजा चौगुले, राजेंद्र शिरोडकर, आदित्य शिरोडकर, सचिव प्रमोद पाटील आदी नेत्यांनी मनसैनिकांची मतं जाणून घेतली. कार्यकर्त्यांनी सुद्धा आतापर्यंत पक्षात काम करताना आलेले अनुभव नेत्यांसमोर मांडले.
पदाधिका-यांमधील आरोप-प्रत्यारोप सादर होताना अंतर्गत कलह, मतभेद ही समोर आले. विभागातील पक्ष वाढीसाठी काय काय करता येईल यासाठी विविध सुचना काही कार्यकर्त्यांनी सादर केल्या. यावेळी विशेष म्हणजे बाळा नांदगावकर यांनी घरी तयार केलेला चिवडा मनसैनिकांसाठी आणला होता.