डोंबिवली : मध्यरेल्वेच्या मार्गावरून लोकल गाड्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार उशीराने धावत आहेत. याचा परिणाम कल्याण डोंबिवलीतील प्रवाशांना होत असून कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. चाकरमान्यांना कामाच्या ठीकाणी पोहोचण्यास लेट मार्क होत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मासीक पगारावर होऊन आणखी नवीन समस्या निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने अशा वेळी डोंबिवली आणि कल्याण स्थानकावरून विशेष लोकल सोडाव्यात व त्याचे नियोजन करावे अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी डोंबिवली रेल्वे स्टेशन महाव्यवस्थापकांची भेट घेतली. त्यावेळी मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष राजेश कदम, जिल्हा संघटक राहुल कामत, महिला शहराध्यक्षा मंदा पाटील, स्मिता भणगे, निलेश भोसले, संजीव ताम्हणे, दिपक शिंदे, वेद पांडे, विवेक भणगे, भाग्येश ईमानदार, हर्षद देशमुख, हेमंत दाभोळकर, ओम लोके, संदिप सागवेकर, सुधिर सप्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मनसेच्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि, रेल्वे स्टेशन पुलावर ये-जा करणाऱ्या डोंबिवलीकरांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या तिकीट तपासणीसांच्या धाडी त्वरीत थांबवाव्यात. कल्याण दिशेकडील पुलाच्या दुरूस्तीचे रखडलेले काम त्वरीत सुरू करून पूल वापरासाठी लवकरात-लवकर सुरू करून प्रवाशांना होणारा त्रासातून मुक्तता करावी.