मुंबई : पालिकेने वीज देयक थकविल्याने मुलुंड पूर्वेतील राजे संभाजी मैदानात अंधार पसरला आहे. मनसेने त्या विरोधात सोमवारी संध्याकाळी अनोखे भीक मागो आंदोलन केले. यावेळी नागरिकांकडे भीक मागण्यात आली. यातून जमा होणारे पैसे डिमांड ड्राफ्ट बनवून पालिकेच्या टी विभाग कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत. तरिही पालिकेने वीज प्रवाह न जोडल्यास वॉर्ड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा मनसेने दिला आहे.
सत्तर हजार रुपये वीज देयक थकल्याने या मैदानाची वीज कापली गेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या प्रकरणी पालिकेला वीज देयक भरा नाहीतर आंदोलन करू, असा इशारा दिला होता. तरिही, पालिकेच्या अधिकार्यांनी वेळकाढूपणा केला. अखेर मनसेने भीक मांगो आंदोलन करत पालिकेचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले.
पालिकेच्या टी विभाग कार्यालयाकडे मनविसेचे विभाग अध्यक्ष सागर देवरे यांनी तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण, संदीप कदम, देवेंद्र वैती, प्रवीण राऊत , राजेश पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मैदानात येणाऱ्या नागरिकांकडे भीक मागितली.