मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विक्रोळीतील एक लोकप्रिय चेहरा निवडून आल्यास महाराष्ट्र विधानसभेत कर्तृत्व आणि शारिरीक उंचीचा इतिहास घडू शकतो. अर्थात हा चेहरा निवडून येणे हे उमेदवार निवड आणि मतदार यांच्यावर अवलंबून असणार आहे. जयंत दांडेकर असे त्यांचे नाव आहे. ‘उंची लहान पण किर्ती महान,’ असेच त्यांच्याबद्द्ल बोलले जात आहे. उंची तीन फुट असूनही त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची प्रभाग क्रमांक ११८ च्या अध्यक्षपदी सुमारे पाच वर्षांपूर्वी निवड केली, जी अद्यापही कायम आहे. पूर्व उपनगरातील विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, नाहूर या मराठीबहुल वस्तीतच नव्हे तर संबंध महाराष्ट्रात दांडेकर हे लोकप्रिय आहेत.
दांडेकर यांची उंची सर्वसामान्य मनुष्यापेक्षा कमी असली तरी पद त्यांच्या उंचीच्या आड आलेले नाही. प्रभाग क्रमांक ११८ मध्ये तर कोणतीही समस्या असो, नागरिक ती सोडविण्यासाठी प्रथम दांडेकर यांच्याकडेच जातात, असे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यांनी महापालिकेची निवडणूक मनसेकडून लढविली आहे, त्यावेळी मनसेच्या एका प्रमुख नेत्याने भाजपमध्ये जाऊन मनसेच्या दांडेकरांविरुद्ध निवडणूक लढविली होती, तरिही न डगमगता दांडेकरांनी यशस्वी लढत दिली. त्यांचा केवळ 220 मतांनी पराभव झाला होता. तरिही नागरी समस्या सोडवायच्या, तर दांडेकर असे समीकरणच या भागात झाले आहे.
लांब दाढी, तीन चाकी मोटारसायकल आणि कपाळावर भगवा टिळा असा पेहराव करणारे दांडेकर विभागात प्रसिध्द आहेत. उंची कमी असूनही त्यांचा आदरयुक्त दरारा विक्रोळीत कायम आहे. काम न करणारे अधिकारी, कंत्राटदार यांनाही वेळप्रसंगी सुनावण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. मनसेच्या स्थापनेबरोबरच राजकारणात सक्रिय असल्याने राज यांच्यापर्यंत दांडेकर यांचे नाव गेले आणि त्यांनी उंची हा पर्याय न पाहता त्यांच्या कामाला न्याय दिला आहे.
दांडेकरांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले असून ते ५५ वर्षांचे आहेत. राज्याच्या राजकारणात बहुधा प्रथमच इतकी कमी उंची असणारा शाखाध्यक्ष झाला आहे. त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, पण ते निवडून आल्यास उंचीचा इतिहासाची नोंद होईल, हे मात्र नक्की.