मुंबई: मुलुंडमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालिका हे खड्डे बुजवण्यात अपयशी ठरली आहे, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिकेची अंत्ययात्रा काढली. पालिकेच्या टी वॉर्ड कार्यालयावर देखील मोर्चा काढला.
मुलुंड विभागातील पूर्व आणि पश्चिम भागातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. नागरिकांचा आवाज पालिकेपर्यत पोहचण्यासाठी मनसेतर्फे विभाग प्रमुख राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या मुख्य इमारतीची प्रतिकृती तयार करून अंत्ययात्रा काढण्यात आली. पी के मार्ग, पाचरस्ता ते टी वॉर्ड कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अनोखी अंत्ययात्रा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्च्याच्या रस्त्यात येणाऱ्या खड्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंघोळ केली. खड्यातील पाणी आणि चिखल बरणीत भरण्यात आला. टी विभागाच्या कार्यालयासमोर या चिखलानी भरलेल्या बरणीचा अभिषेक करण्यात आला. या आदोलनामुळे पालिकेचे धाबे दणालेले. टी विभागातर्फे ४८ तासांत खड्डे भरण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भाई जुवळे,लक्ष्मी सोनावणे,राजेंद्र देशमुख,सागर देवरे अनिल झोळकर उपस्थित होते.
मुलुंडमधील अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे या खड्ड्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या अगोदर कल्याण येथे ५ जणांचा खड्ड्यामुळे बळी गेला आहे. पालिकेचे डोळे उघडण्यासाठी आम्ही अंत्ययात्रा काढली. ४८ तासांत खड्डे बुजवतो असे आश्वासन आम्हाला टी वॉर्डतर्फे देण्यात आले आहे. खड्डे बुजले नाही तर आणखी उग्र आंदोलन करू असे मनसेचे विभागप्रमुख राजेश चव्हाण यांनी सांगितले.