
उद्धव ठाकरे यांचा राजीनामा म्हणजे राजकीय अपरिपक्वता काय असते याचं उत्तम उदाहरण – शिवसेना आमदार योगेश कदम
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांचा राजीनामा म्हणजे राजकीय अपरिपक्वता काय असते याचं उत्तम उदाहरण आज उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण देशाला दिलेलं आहे, अशी टीका खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केली आहे. ते दापोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच आतातरी त्या बडव्यांना बाजूला करा आणि शहाणे व्हा असा उपरोधिक टोलाही आ. योगेश कदम यांनी लगावला आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुका संघटक प्रदीप सुर्वे, ममता शिंदे आदी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले की, मुख्यमंत्री पदावर बसणे किंवा मुख्यमंत्री पद मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून मिळवणं सोपं असतं, परंतु त्या पदाला न्याय देणे किंवा त्या खुर्चीवर बसल्यानंतर जी जबाबदारी येते, ती जबाबदारी पार पाडणे हे तितकंच कठीण असतं. किंबहुना मुख्यमंत्री पदाचे अधिकार, राजीनामा दिल्यानंतर काय होतं, राजीनामा न दिल्यानंतर काय होतं, याबाबतीतली राजकीय अपरिपक्वता काय असते याचं उत्तम उदाहरण आज उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण देशाला दिलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं आहे, जर का राजीनामा दिला नसता, तर आम्ही तुमचं सरकार पुन्हा स्थापित करू शकलो असतो, परंतु राजीनामा दिल्याने आम्ही पुन्हा मागे जाऊन हे सरकार स्थापन करू शकणार नाही, त्यामुळे मला वाटतं त्यांच्या आजूबाजूचे जे सल्लागार आहेत, ते किती ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, 2019 ला ज्यांच्यामुळे महाविकास आघाडी झाली, आणि तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं असा जो तुमचा भ्रम होता, आता त्यांच्या सल्ल्यामुळेच तुमचं सरकार पडलं, आतातरी डोळे उघडा, आतातरी त्या बडव्यांना बाजूला करा आणि शहाणे व्हा असा उपरोधीक टोला आमदार योगेश कदम यांनी यावेळी लगावला. तसेच राजकीय बुद्धिमत्ता जेव्हा कमी पडते, त्यावेळी राजकारणात पराभव होतो, याचं उदाहरण आज संपूर्ण देशाला उद्भवजींनी घडवून दिलेलं आहे असं देखील आमदार योगेश कदम यावेळी म्हणाले.
संभ्रमावस्थेत असणारे अनेक जण आता आपल्याकडे येतील – आ. कदम
आमदार योगेश कदम म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संभ्रमावस्थेत असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक हे शिवसेना पक्षाकडे येतील त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांना खुर्ची व राष्ट्रवादी सोडवत नव्हती. त्यांनी खुर्चीच्या हट्टापायी आपला पक्ष संपवला मात्र आता आमचा पक्ष हाच शिवसेना पक्ष असल्याचे व आम्ही शिवसेनेचे असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे आता संभ्रमावस्थेत असणारे अनेक जण आपल्याकडे येतील असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.
आम्ही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार यात शंका नाही – आ. योगेश कदम
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे आम्ही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार यात शंका नाही. या उरलेल्या काळात विकास कामांवर भर देणार असल्याचे देखील व विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा वेळ आपल्याकडे नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच विधिमंडळात शिवसेना या नावाचा एकच पक्ष आहे. त्या पक्षाचे भरत गोगावले हे प्रतोद आहेत. आता शिवसेना चिन्हावर निवडून आलेल्या सर्वांना भरत गोगावले यांचा निर्णय हा मान्य करावा लागेल असे देखील त्यांनी सांगितले.
आपलं सरकार हे घटनेनुसार व संविधानानुसार असल्याचे कोर्टाच्या निकालाने सिद्ध – आ. कदम
निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही हे आज न्यायालयाने स्पष्ट केल्याने निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला दिले आहे, त्यामुळे पक्ष हा कुणाचा आहे हा प्रश्न संपुष्टात आला आहे. आम्ही शिवसेना पक्षाचे आहोत व शिवसेना पक्ष आपला आहे.
सोळा आमदार अपात्रतेबाबत विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्वाना न्यायालयाच्या निकालामुळे पूर्णविराम मिळालेला आहे. आपले सरकार घटनाबाह्य असल्याच्या टीकेला देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पूर्णविराम मिळालेला आहे. आपलं सरकार हे घटनेनुसार व संविधानानुसार असल्याचे कोर्टाच्या निकालाने सिद्ध झाले आहे, असे देखील आमदार योगेश कदम यावेळी म्हणाले.