डोंबिवली : समाज सेवा व सामाजिक प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले व त्यात आपल्या समस्त समाज बांधवांच्या सहकार्याने मी यशस्वी झालो. जास्त प्रमाणात राजकारण न करता समाजकारणात लक्ष केंद्रित केले व आज मला सन्मान बहुमान मला मिळाल्याची प्रतिक्रिया कोळी महासंघाचे अध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार रमेशदादा पाटील यांनी महाराष्ट्ररत्न पुरस्कार सोहळ्याप्रसंगी दिली.
यावेळी व्यासपीठावर जनसेवा संघाचे सरकार्यवाह अरुण मुळे, अखिल भारतीय कोळी समाजचे युवा अध्यक्ष परेश कांती कोळी, डोंबिवली आगरी कोळी महोत्सवाचे अध्यक्ष जयेंद्र पाटील इत्यादीसह बहुसंख्य आगरी कोळी समाज बांधव, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
भांडुप मुंबई येथील आगरी समाज नेते जयेंद्र खुणे आयोजित जनसेवा संघ संचालित श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड या सायन्स व कुमारी कस्तुरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोळी महासंघाच्या सभागृहात कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजित पार पडला. यावेळी आगरी समाज नेते व भारतीय पुरस्कार विजेते संघाचे अध्यक्ष जयेंद्र खुणे यांच्या शुभहस्ते “महाराष्ट्र रत्न पुरस्कार” देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देत आमदार पाटील यांनी वरील प्रतिक्रिया दिली. समाजकरणाच्या या प्रवासात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड कशी झाली याचा उहापोह केला. आगामी काळात आगरी कोळी बांधवांच्या कुठल्याही समस्या असोत त्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून बांधवांनो विखरू नका समाज संघटीत करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.