रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार तथा उमेदवार निरंजन डावखरे शुक्रवार दि. २१ जून रोजी रत्नागिरीत येणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून ते रत्नागिरी शहरातील मतदारांशी संवाद साधणार आहेत. शहरातील विविध शाळा, शैक्षणिक संस्था, वकिल मतदारांना ते भेटून आपली भूमिका मांडणार आहेत. या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी डावखरे यांनी ताकद पणाला लावली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होणार आहे. सहा जिल्ह्यांतील दोन लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. श्री. डावखरे यांनी या मतदारसंघात सलग दोन वेळा विजय मिळवला असून आता तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवत असून मतदारांशी संपर्क साधत आहेत. भाजपा महायुतीनचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी या निवडणुकीत जोरदार प्रचारयंत्रणा राबवली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचारार्थ मेळावा घेतला. तसेच भाजपाचे कोकणचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यूहरचना केली आहे.
रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये निरंजन डावखरे यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा नेते अॅड. दीपक पटवर्धन, निवडणूक प्रमुख मनोज पाटणकर यांच्यासमवेत शहराध्यक्ष राजन फाळके, माजी नगरसेवक, तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष व विविध आघाड्यांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सकाळी भेटीगाठी घेतल्यानंतर श्री. डावखरे दुपारी देवरुख, साखरपा येथील मतदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच रात्री पुन्हा रत्नागिरीत येणार असून त्यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी वार्तालाप, काही ठिकाणी मतदारांशी संपर्क साधण्यात येणार आहेत. त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारासाठी जाणार आहेत.