मुंबई : चर्नी रोड रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल तुटल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे, तेव्हा हा पूल तातडीने उभारा तसेच पर्यायी व्यवस्थाही करा अशी मागणी आमदार मंगल प्रभात लोढ़ा यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
लोढ़ा यांनी याबाबत नुकतेच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे व वाहतूक विभाग अधिकारी व स्थानिक नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदार यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी नागरिकांना भेटून समस्या जाणून घेतल्या. संभाव्य दुर्घटनेला टाळण्यासाठी चर्नी रोड़वर दक्षिणेकडून प्लॅटफॉर्मवर पोहचण्यासाठी पूल होईपर्यंत पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, असे लोढा म्हणाले.
चर्नी रोड येथे दक्षिणेकडून प्लॅटफॉर्मला समांतर असलेला स्कायवॉक आधीच तोडून टाकण्यात आला आहे. रविवारी रात्री ठाकुरद्वार रोडवरून येणारा ब्रिज पडल्यामुळे लाखो लोकांची अडचण होत आहे. अन्य पर्याय उरलेला नसल्यामुळे प्रवासी रेल्वेरूळ ओलांडून स्टेशनवर जात आहेत. पूलाचे काम त्वरित सुरू न केल्यास आंदोलन करू, असा इशारा लोढा यांनी दिला.