रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरीमध्ये शुक्रवारपासून मिसळ महोत्सव सुरु झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन आज रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते करण्यात आलं. वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळची चव चाखण्यास सध्या या महोत्सवामध्ये खवय्यांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
मिसळ… नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. मिसळ-पाव आणि वर रस्सा.. सकाळच्या वेळेत घरातून नाश्ता न करता बाहेर पडलेले अनेकजण मिसळवर यथेच्छ ताव मारतात. तर कित्येकजणांचे दुपारचे जेवण देखील या मिसळ पाववरच होते. अशा या लज्जतदार मिसळची चव चाखण्यासाठी खास पर्वणी रत्नागिरीकरांना आजपासून उपलब्ध झाली आहे… कारण पुणे, ठाणे आणि मुंबईपाठोपाठ आता रत्नागिरीतही मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजरत्न प्रतिष्ठानने खास या मिसळ महोत्सवाचं आयोजन केलं आहे. आजपासून सुरु झालेला हा मिसळ महोत्सव 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रत्नागिरीतील माळ नाका येथील व्यायामशाळा मैदानावर हा महोत्सव सुरु झाला आहे. मिसळचे जवळपास 20 स्टॉल्स या महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळची चव या महोत्सवामध्ये चाखायला मिळत आहे. त्यामुळे खवय्यांसाठी हि एक पर्वणीच असणार आहे.