रत्नागिरी, (आरकेजी) : संतप्त मिऱ्यावासीयांनी आज (मंगळवार) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मि-या किनारी समुदाचे पाणी ग्रामस्थांच्या सातबारावर आले आहे. तर दुसरीकडे मिरकरवाडा टप्पा क्रमांक २ चे काम चुकीच्या पध्दतीने केले जात असल्याने मिऱ्या गावाला मोठा धोका निर्माण झाला असून आम्ही आपणास विनंती करतो की, टप्पा क्र. २ मिरकरवाडा बंदराचे काम चुकीच्या पध्दतीने केले जात आहे. या पावसात समुद्राचे पाणी वस्तीत शिरल्याने सर्वात मोठे संकट मिऱ्यावासीयांवर कोसळले आहे. यंत्रणा ठप्प असल्याने किनारपट्टी भागातील लोकांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याचे आहेम असे सांगत आज संतप्त मिऱ्यावासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भागाची प्रत्यक्ष पहाणी करून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
गेले काही दिवस जिल्ह्यात धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने किनारपट्टी भागात चांगलेच थैमान घातले होते.तर दुसरीकडे समुद्राला असलेल्या उधणात लाटांचे तांडव सुरू झाल्याने संपूर्ण किनारपट्टी तडाख्यात सापडल्याने किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली.ठिकठिकाणांचे धूपप्रतिबंधक बंधारे उद्धवत झाल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.किनारपट्टी भागात सध्या जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. प्रशासन व संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने मंगळवारी पंधरा माड ते मिर्या येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.
पावसाळ्यात या भागात कसे दिवस काढले जातात याची वस्तुस्थिती यावेळी सांगण्यात आली. तसेच मिरकरवाडा टप्पा क्र.२ चे चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रत्यक्षात आराखड्याप्रमाणे ५०% पण काम केले जात नाही. सक्षम अधिकारी केव्हाच प्रकल्पाच्या ठिकाणी भेटत नाहीत. गेल्या २ ते ३ वर्षात मिऱ्यासागरी धुपप्रतिबंधक बंधाऱ्यावरती काम झालेले नाही, असे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच महसूल विभाग गेली दोन वर्षे किनारपट्टी वस्तीवरील लोकांना मान्सूनमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या नोटीसा बजावत आहे. प्रत्यक्षात लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी व अकस्मात पाणी शिरल्यास कोणत्याही उपाययोजनांची पूर्वतयारी नाही. वस्तुस्थिती जाणून न घेता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारास पाठिंबा देत आहेत. ग्रामस्थांच्या भावनांशी जीवघेणा खेळ खेळतआहेत अशी कैफियत देखील यावेळी मांडली.
मिऱ्या सागरी धूपप्रतिबंधक बंद्या-याबाबत संबंधीत कार्यालयात माहिती मागितल्यास माहिती देण्यास संबंधीत अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. याबाबतची सर्व सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान आमचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांना सविस्तर कळवावे व तत्पूर्वी ज्या ज्या ठिकाणी बंधारा तुटला आहे त्या त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष तातडीने पहाणी करून काम करण्याचे त्वरीत आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.