
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी काही भागात अधूनमधून सरी बरसत आहेत. दरम्यान, किनारपट्टी भागात आज साडेचार मिटरच्या लाटांचा थरार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी या लाटांचा मिऱ्या बंधाऱ्याला तडाखा बसला आहे. या तडाख्यामुळे धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडलं आहे. आज आणखी दोन ठिकाणी या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडलं.
विशेष म्हणजे हा बंधारा यावर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आला होता. तसेच या बंधाऱ्यावर डांबरीकरण रस्ताही तयार करण्यात आला होता. मात्र ,लाटांच्या माऱ्यामुळे हा बंधारा फुटला असून आता वस्तीच्या दिशेने लाटांचा मारा होत आहे. आलावा ते पंधरामाड या गावांची समुद्राच्या लाटांमुळे होणारी धूप थांबवण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र या अजस्त्र लाटांमुळे या बंधाऱ्याला पुन्हा एकदा मोठं भगदाड पडलं आहे. यावर्षी साडेचार मिटर उंचीच्या अजस्त्र लाटांनी मिऱ्या इथल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला भगदाड पडलं आहे. तर नव्यानेच बांधलेला रस्ता देखील मोठया प्रमाणात खचला आहे. त्यामुळे इथले नागरिक भीतीच्या छायेत सावटाखाली आहेत. कधीही हा बंधारा पूर्ण फुटून समुद्राचं पाणी मानवी वस्तीत घुसू शकतं. त्यामुळे इथले नागरीक चिंतेत आहेत.