रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून दुसऱ्या दिवशीहि संततधार कायम आहे. त्यात खळवलेल्या समुद्राच्या अजस्त्र लाटा कोकण किनारपट्टीवर धडकत आहेत. चार ते साडेचार मिटर उंचीच्या या लाटांचा फटका मिऱ्या इथल्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याला बसला आहे. दोन ठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे इथले नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.
मुसळधार पाऊस त्यात सागराच्या अजस्त्र लाटा यामुळे रत्नागिरी शहरातील पंधरामाड भागातील सागरी धूप प्रतिबंधक बंधारा अधिकच कोसळू लागला आहे. उधाणाच्या या अजस्त्र लाटा सध्या या बंधाऱ्यावरून पलिकडे येत आहेत. किनाऱ्याला धडक देणाऱ्या महाकाय सागरी लाटांमुळे मिऱ्या परिसरातील धूपप्रतिबंधक बंधारा जागोजागी खचला आहे. तसेच धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचा भाग दोन ठिकाणी वाहून गेला आहे. यामुळे पंधरामाड, आलावा आणि मिऱ्या गावातील ग्रामस्थ भयभित झाले असून इथल्या कुटुंबीयांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही या धूपबंधाऱ्याचे काम योग्यरित्या झालेले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच मिकरवाडा बंदराच्या सुरक्षिततेसाठी सागरात उभारण्यात आलेल्या वाय आकाराच्या ब्रेक वॉटर वॉलमुळेही पंधरामाड व मिऱ्या किनाऱ्याकडे पाण्याचा प्रवाह वाढल्याने पंधरामाडसह मिऱ्या गावही सागरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा हा बंधारा पूर्ण वाहून गेल्यास आमची घरं सागराच्या विळख्यात सापडतील अशी भीती इथले नागरिक व्यक्त करत आहेत.