मुंबई, (निसार अली) : जाहीर सभा सुरू असताना काँग्रेसच्या गोटात आनंद निर्माण होईल, अशी घटना आज मालवणीत घडली. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार अस्लम शेख निवडणूक लढवत आहेत. शेख यांची सभा सुरू असताना त्यांना एमआयएम आणि मुस्लिम लीगने आज पाठिंबा जाहीर केला. तसेच उमेदवार मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेस समोरील मतविभाजनाचे संकट टळले आहे.
एमआयएमचे अधिकृत उमेदवार इस्माईल शेख यांनी अस्लम शेख यांना समर्थन देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय मालवणीतील जाहीर सभेत केला. तसेच इंडियन युनियन मुस्लिम लीगनेही पत्रक काढून आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. अस्लम शेख यांच्या समर्थनात निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला गेल्याने मतांचे विभाजन थांबणार आहे. त्यामुळे अस्लम यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्य विरोधक भाजपचे रमेश सिंह ठाकूर यांची मात्र चिंता वाढली आहे. आधीच ते आयात केले गेल्याने स्थानिक कार्यकर्ते व समर्थकांमध्ये मतभेद आहेत.