मुंबई, (निसार अली) : ज्येष्ठ कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे आज मुंबईत निधन झाले. गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक लढे दिले तसेच विस्थापित झालेल्या गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना हक्काचे घर मिळावे, यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. सरकारसमोर गिरणी कामगारांच्या घरांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा कामगारांची एकजुट उभारली होती.
मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते. उद्या सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. आज सकाळी त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली.
इस्वलकर यांच्या निधनाने मुंबईच्या कामगार चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी अखेरपर्यंत ते कार्यरत राहिले. गिरण्या बंद झाल्यानंतर गिरणी कामगारांची चळवळ पुन्हा उभारण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. 2011 साली गिरणी कामगारांच्या विविध संघटनांनी हक्काच्या घरांसाठी मुंबईत भव्य मोर्चा काढला होता. इस्वलकर यांनीही या मोर्चाचे नेतृत्व केले होते.