
स्वातंत्र्यपूर्व भारतात मिल्खा सिंग जन्मले. त्यानंतर त्यांनी अनुभवलेल्या फाळणीच्या जखमा, सैनिकी जीवन, यशस्वी धावपटू होण्यासाठी केलेले प्रयत्न आदी त्यांच्या जीवनातील प्रसंग पुस्तकात खुलविण्यात आले आहेत. ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कीर्ती प्राप्त केलेल्या मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेला ’भाग मिल्खा भाग’ हा सुंदर सिनेमा अलीकडेच येऊन गेला. सिनेमाने बरेच पुरस्कार देखील पटकावले. सिनेमा ठराविक वेळेत दाखवायचा असल्याने मिल्खा सिंग यांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा आरंभकाळ त्यात दाखवला गेला आहे. परंतु, त्यांच्या आत्मकथनात सिनेमात दाखवल्या गेलेल्या दृश्यांव्यतिरिक्त त्यांच्या जीवनाचा संपूर्ण पट उलगडला आहे.
आत्मचरित्रात २० प्रकरणे आहेत. त्यापैकी अविभाजित भारतातील आयुष्य, माझे सैनिकी जीवन, हा खरा खेळ नव्हता, पंडित नेहरूंशी भेट, माझ्या मुकुटातील रतन, खेळातले राजकारण यांचा खास उल्लेख करता येईल. फाळणीच्या वेळी मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयांची झालेली हत्या, त्यांचे बालपण खुडून जाणे असे अनेक संवेदनशील प्रसंग पुस्तकात आहेत. तरुणपणात त्यांनी सैन्यात नोकरी केली. आयुष्यातली पहिली शर्यत त्यांनी इथेच जिंकली .पहिल्या शर्यतीनंतर ‘क्रीडापटू मिल्खा सिंग’ ते ‘उडणारा शीख’ हे बिरुद आयुष्यभर मिरवणार्या तरुणाची ही प्रेरणादायी कथा आहे. “आयुष्यातील अडचणींपासून पळून न जाता, त्यांना सामोरे जा” असा संदेशच यातून मिळतो. यामुळे वाचकाच्या हाती निराशा नाही तर यशाची किल्ली आपोआप लाभते.
पुस्तकाचे नाव : एक आत्मकथा, मिल्खा सिंग : माझ्या आयुष्याची शर्यत
अनुवाद : चांदोरकर नीला
प्रकाशक : जायको बुक्स
किंमत : १९९ रुपये