डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महापालिकेचा औद्योगिक निवासी भागात गणेश विसर्जन तलाव असून या तलावाची सहा महिन्यांपासून साफ सफाई न झाल्याने तलावात प्लास्टीक आणि काचऱ्यानी भरला असून पाण्यावर हिरवी वनस्पती उगवली असल्याने पाणी हिरवे दिसत आहे. पर्यावरण रक्षणासाठी साैंदर्य अबाधित ठेवण्यासाठी विविध शैक्षणिक सामाजिक संस्था तयार आहेत त्याना ते दत्तक म्हणून द्यावे अशी मागणी नागरिक करत असून तसे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे. निवासी भागातील गणेश विसर्जन तलाव कै. खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून सुशोभित करण्यात आला होता. यासाठी माजी स्थानिक नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र गणेश विसर्जनासाठी असलेला तलाव हरित लवादाने पर्यावरणांस बाधा येत असल्याने त्या तलावात गणेश विसर्जनास बंदी घातली आहे. मिलापनगर तलाव प्रदुषण मुक्त व्हावा व त्याचे सुशोभिकरण करण्याची गरज आहे. गेल्या सहा महिन्यात तलावातील कचरा काढण्यात आला नाही त्यामुळे तलावात मोठया प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा साठला आहे. तसेच तलावाची स्वच्छता नसल्याने पाण्यावर हिरवी वनस्पती उगवली असून जणू हिरवी शाल पसरली असल्याचा भास होत आहे. या तलावाचे साैंदर्य अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक शैक्षणिक व सामाजिक संस्था गणेश तलाव ”दत्तक ”घेण्यास तयार आहेत. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे या तलावातील कचरा,प्लास्टिक पिशव्या काढून उगवलेली हिरवळ काढून तलाव स्वच्छ करावा अशी मागणी करणारे पत्र मिलापनगर रेसिडेन्टस वेलफेअर असोसिएशनच्या वर्षा महाडिक,राजू नलावडे आदिंनी केली आहे. जर हा तलाव दत्तक दिला तर महापालिकेची आर्थिक बचत होईल व पर्यावरणाचे रक्षण होइ्रल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.