
मोशन पोस्टरमध्ये सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये यांच्यात खुर्चीसाठीची चढाओढ दिसत आहे. या चढाओढीत आता ते हातमिळवणी करणार की, दोघांपैकी कोणाची सत्ता स्थापन होणार? हे ‘मी पुन्हा येईन’ आल्यावरच कळेल. दरम्यान या वेबसीरिजमध्ये राजकारणातील कट- कारस्थाने, नेत्यांची फोडाफोडी आणि मुख्य म्हणजे सध्या चर्चेत असलेले ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, ” खरं सांगायचे तर वास्तवातील राजकारणापर्यंत पोहोचणे आपल्यासारख्यांना शक्यच नाही. मात्र बहुमतासाठी पक्षांची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, नेत्यांची कारस्थाने कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्र म्हणजे ‘मी पुन्हा येईन’.”
‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्रेक्षकांना असे विषय पाहायला आवडतात. या वेबसीरिजचा सध्याच्या राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नसून राजकारणात घडत असणाऱ्या काही गोष्टी यात पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजची निर्मिती निव्वळ मनोरंजनच्या हेतूने करण्यात आली आहे.”















