
रत्नागिरी, (आरकेजी) : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तशी घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूणमधले नेते माजी आमदार रमेश कदम यांनी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र या पक्षात वर्षपूर्ती होण्याआधीच त्यांनी भाजपपासूनही फारकत घेतली आहे. चिपळूणमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तशी घोषणाच केली. भाजपमध्ये जावून आठ महिने झाल्येत, कोणतेही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवले आहे . कोणत्याही सभेला, बैठकीला बोलावणे नाही त्यामुळे जर आपली किंमतच नसेल तर राहून तरी काय करणार ? यास्तव पक्ष सदस्य नसल्याने मी भाजपमुक्त होत आहे अशी घोषणा माजी आमदार रमेश कदम यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
लवकरच कार्यकर्त्यांचा आणि हितचिंतकाचा मेळावा घेणार आहोत. कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊ. तसेच कोणत्या पक्षात जाणार आहोत याचा अद्याप विचार केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी नगरपालीकेच्या कारभारावर टीका केली. लोकांची कामे होत नसतील आणि विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचारच होत असेल तर आपण यावर आक्रमक होवून पावले उचलू. परिवर्तनच्या नावाखाली हे सत्तेवर आले व लाखो रुपयांचा टेंडर घोटाळा सुरू आहे , हे मी पाहतो आहे, त्यामुळे आमच्या नगरसेवकांचा गट स्वतंत्र आहे तो यांना पाठींबा देणार नाही. प्रामाणिक व विधायक काम असेल तर जरुर विचार करू मात्र आजपासून आम्ही नगरपालिकेत स्वतंत्र आहोत असेही कदम यांनी सांगितले.
लोकांना साध पाणी व्यवस्थित मिळत नाही, भुयारी गटारांसारख्या फसव्या योजना विकासाच्या नावाखाली आणल्याचे सांगितले जाते पण हे सारे चुकीच असल्याचे ते म्हणाले.