मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडातर्फे राज्यात २१ प्रकल्पांचे बांधकाम सुरू असून या माध्यमातून जवळपास ४२ हजार परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या (नागरी) माध्यमातून १४२ शहरामध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार ५०५ घरकुलांचे ४६ प्रकल्प सुरु असून यासाठी ३७२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागासाठी गेल्या दोन वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर योजनेंतर्गत ४ लाख ६७ हजार घरांच्या निर्मितीची उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यापैकी ४ लाख ७० हजार घरकुलाना मंजुरी देण्यात आली. २ लाख ७६ हजार घरकुलांना पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे. वरळी, नायगाव आणि ना.म.जोशी मार्ग या बीडीडी चाळ पुनर्वसनातून १६ हजार २०३ भाडेकरूंचे पुनर्वसन होणार असून या प्रकल्पातून १३ हजार परवडणाऱ्या घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यासाठी अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले आहेत. या पुनर्वसन योजनेत दिरंगाई करणाऱ्या ४२ विकासकांची नियुक्ती रद्द केली आहे.
जवळपास ४ हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळाली असून दीड लाखाहून अधिक सदनिका धारकांना किमान ३५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सदनिका उपलब्ध होणार आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरही घरांच्या योजना राबविण्याचा शासनाचा विचार आहे. या संदर्भात शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे.