
मुंबई, दि. 3 एप्रिल ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) नागरिकांसाठी स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘आपला दवाखाना’ या नावाने म्हाडाच्या ३४ वसाहतींमध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या या उपक्रमासाठी म्हाडाने वन रूपी क्लिनिक संस्थेसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.
हा करार 2 एप्रिल रोजी वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात झाला. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, उपमुख्य अधिकारी अनिल वानखेडे तसेच वन रूपी क्लिनिकचे डॉ. राहूल घुले, डॉ. अमोल घुले आणि डॉ. मोहन नागरगोजे उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत, म्हाडाच्या ११४ अभिन्यासांपैकी ३४ वसाहतींमध्ये नाममात्र शुल्कात वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे. नागरिकांना केवळ १ रुपयांमध्ये वैद्यकीय तपासणीची सुविधा मिळेल. तसेच रक्त तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणीसाठी फक्त १० रुपये शुल्क आकारले जाईल. म्हाडाच्या वसाहतींमध्ये ४०० चौरस फुटांचे क्लिनिक सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही सुविधा केवळ म्हाडा वसाहतीतील रहिवाशांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहे. कुलाबा-कफ परेड, चेंबूर, पंतनगर-घाटकोपर, विक्रोळी, कांदिवली, प्रतिक्षा नगर, सायन, अंटोप हिल-वडाळा, ओशिवरा, सांताक्रूझ, अंधेरी, वांद्रे, जुहू, कुर्ला, मानखुर्द, माहीम, बोरीवली आदी ठिकाणी हे दवाखाने उभारण्यात येणार आहेत.
म्हाडाच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा मिळणार असून, त्याचा मोठा लाभ होईल.















