मुंबई : मेट्रो कारशेड आरेला परत हलवण्याचा निर्णय मागे घ्या, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
आरे येथील मेट्रो कार शेडमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार आहे, यामुळे मुंबईच्या जनतेने आंदोलन केले होते. आंदोलकांची भूमिका न्याय्य असल्याने महाविकास आघाडी सरकारने शेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता, आणि आरे हे संरक्षित वनक्षेत्र म्हणून जाहीर केले होते, अशी माहिती पक्षान दिली.
कालच शपथविधी झाल्यावर आज उपमुख्यमंत्रीपदाचा अधिकार दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा हा निर्णय ‘दोघांच्या’ कॅबिनेट बैठकीत रद्द झाल्याची घोषणा केली आहे. हा केवळ महाविकास आघाडीचा सूड नसून चांगल्या पर्यावरणात जगू इच्छिणाऱ्या मुंबईकरांवर घेतलेला सूड आहे, असे पक्षाने म्हटले आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सरकारच्या निर्णयाचा निषेध करत असून पुन्हा आंदोलनाचे खड्ग हातात घेण्याचा इशारा देत आहे,असे डॉ. उदय नारकर राज्य सचिव यांनी म्हटले आहे.