मुंबई : तीन दिवसापूर्वी झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या शारदा घोडेस्वार यांच्या चेंबुर येथील घरी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भेट देऊन मुलांचे सांत्वन केले. तसेच त्यांना वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली. स्थानिक आमदार तुकाराम काते, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, स्थानिक नगरसेविका समृध्दी काते, एम /पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त हर्षद काळे उपस्थित होते .
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मिळणारी एक लाख रुपयांची मदत ही तुंटपुंजी असून मोठया मुलाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी महापौरांकडे यावेळी केली. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे धोकादायक झाडांबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केल्यास तातडीने संबधित त्याठिकाणी जाऊन पाहणी करावी व तात्काळ योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱयांना केली.















