मुंबई, विशेष प्रतिनिधी:- रुळांची, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणा आदी विविध दुरुस्ती कामांसाठी रविवार २७ डिसेंबरला मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु आहे. या कालावधीत माटुंगा – मुलुंड दरम्यान धावणाऱ्या लोकल धीम्या मार्गावर वळवल्या आहेत. तर ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील विशेष लोकल मुलुंड – दादर दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी, बेलापूर, नेरुळ, खारकोपरसह अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या पनवेल लोकल सेवा बंद राहतील. पनवेल स्थानकातून सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या लोकल सेवा बंद राहतील. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे स्थानकातून पनवेलसाठी आणि पनवेल व बेलापूर स्थानकातून ठाण्यासाठी सुटणाऱ्या लोकल सेवा बंद राहणार आहेत. सीएसएमटी – वाशी स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. तसेच दुरुस्तीच्या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे – वाशी स्थानकांदरम्यान लोकल सेवा सुरु राहिल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, बोरिवली – गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल धीम्या मार्गावर वळवल्या आहेत.