नवी दिल्ली : महात्मा गांधीजींनी केलेला मीठाचा सत्याग्रह म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील जनसहभागाचे उत्तम उदाहरण होते, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले. संसदेच्या ग्रंथालयामध्ये ठेवण्यासाठी महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती देणारे संग्रहित १०० खंड माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज महाजन यांना सादर केले.
गांधीजींच्या एका साध्या संदेशामुळे स्वातंत्र्याच्या जन आंदोलनाचा प्रारंभ झाला. मीठाच्या सत्याग्रहामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे त्याला स्वातंत्र्यलढ्याचे स्वरुप प्राप्त झाले. गांधी यांच्या देशसेवेच्या तत्वज्ञानाचा प्रभाव जागतिक पातळीवर पडला, असे त्या म्हणाल्या. महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती या १०० खंडामध्ये असून हा संग्रह संसदेच्या ग्रंथालयात उपलब्ध असणार आहे. संसदेच्या सदस्यांना या संग्रहातून आपला वारसा जाणून घेता येऊ शकेल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या खंडांच्या निर्मितीसाठी घेतलेल्या मेहनतीचे सुमित्रा महाजन यांनी कौतुक केले आणि सरकारच्या विकास कार्यक्रमाचे धोरण पुढे नेण्यासाठी माहिती आणि मंत्रालय घेत असलेल्या पुढाकारांबद्दल प्रशंसा केली.
स्वातंत्र्याच्या चळवळीला नैतिक पाठबळ देण्याचे कार्य सत्य आणि अहिंसा या विषयावर गांधीजींनी केलेल्या लेखनाने दिले. तसेच त्यांच्या लेखनाने या चळवळीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली, असे प्रतिपादन व्यंकय्या नायडू यांनी यावेळी केले.
महात्मा गांधीजी १५ वर्षांचे असताना म्हणजे १८८४ ते ३० जानेवारी १९४८ पर्यंत त्यांनी लिहिलेल्या तसेच व्यक्त केलेल्या विचारांचा हा अमूल्य संग्रह आहे, अशी माहिती नायडू यांनी यावेळी दिली.
अहमदाबादच्या साबरमती आश्रमाच्या “गांधी हेरिटेल पोर्टल” वर या साहित्याची “डिजिटल मास्टर कॉपी” उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच हे खंड ऑनलाईन विकत घेता येणार असून एका खंडाचे मूल्य १०० रुपये आहे. खंडांचा संपूर्ण संच विकत घेणाऱ्यांसाठी २५ टक्के सवलतीमध्ये म्हणजे ७५०० रुपयांमध्ये मिळणार आहे.