रत्नागिरी (आरकेजी): औषधांच्या ऑनलाईन विक्री विरोधात केमिस्ट आणि वितरकांची संघटना आक्रमक झाली असून याविरोधात २८ सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (एआयओसीडी) यांनी पुकारलेल्या बंदला फेडरेशन ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसीएशन ऑफ इंडियाने पाठींबा दिला आहे.ऑनलाइन कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत. सरकार मात्र गप्प आहे. याच्या निषेधार्थ भारतातील सर्व केमिस्टस् दुकानांनी २८ सप्टेंबरला एक दिवसीय बंद पुकारला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील औषध दुकानेसुद्धा या दिवशी पूर्ण बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास ५०० मेडिकल या बंद सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश शिंदे यांनी बुधवारी (आज) रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. केंद्र सरकारने इंटरनेटद्वारे औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई फार्मसीज्ना कोणत्याही स्वरूपात कार्य करण्याची दिलेली मुभा यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे. ऑनलाइन विक्रीमुळे केमिस्ट, ड्रगिस्ट दुकानदारांचे नुकसान होणार असून ग्राहकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. यापूर्वी केंद्र सरकार व संबंधित सर्व अधिकार्यांसोबत चर्चा करूनही योग्य उत्तर मिळालेले नाही. दोन वेळा भारत बंदचे आयोजनही केले. परंतु सरकारने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तसेच अनधिकृतपणे वेबसाईट चालवून औषध विक्रीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रिटेलर व सर्व होलसेल या दिवशी बंद राहणार आहेत. मात्र रुग्णांची गैरसोय होणार नाही, त्यांना अत्यावश्यक औषधे लागल्यास प्रत्येक तालुक्यात तशी व्यवस्था करण्यात आली आहे. संघटनेकडून प्रत्येक तालुक्यासाठी फोन नंबर्स देण्यात आले आहेत. त्या फोनवर संपर्क केल्यास रुग्णांची गरसोय दूर होऊन औषधं उपलब्ध होऊ शकतात असं उन्मेश शिंदे यांनी स्पष्ट केले.















