मुंबई : माहितीच्या स्फोटाच्या युगात सकारात्मक ज्ञानाचा अभाव राहू नये यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र’ यांनी समाज विघातक कृत्याविरोधात ढाल बनवून काम करावे. त्या माध्यमातून सकारात्मक, सक्षम महाराष्ट्र घडवू, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्यस्तरीय ‘सोशल मीडिया महामित्र’ सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवासन, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर, लोकमत न्यूज 18 चे संपादक डॉ. उदय निरगुडकर, उद्योगपती दिपक घैसास, मिलिंद कांबळे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, स्पृहा जोशी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप लोखंडे, अनुलोमचे अतुल वझे यावेळी उपस्थित होते.माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महाराष्ट्र शासन (Govt of Maharashtra)’ या जिओ चॅट चॅनलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण करण्यात आले.हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीचा स्फोट होतो. मात्र त्यात ज्ञानाचा अभाव असल्याने त्यातून वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेता या माहितीच्या स्फोटातून निर्माण होणारी नकारात्मकता मिटविण्यासाठी सोशल मीडियाच्याच माध्यमातून सकारात्मक संदेश पसरविण्याचे काम महामित्रच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.