मुंबई (स्थानिक वार्ता): विकासकामे करताना मुंबई महापालिकेच्या कंत्राटाराने विक्रोळी कन्नमवार नगरात जेसीबीच्या सहाय्याने इमारतींचे कुंपण, प्रवेशद्वार, वीजवाहिन्या आणि झाडे तोडण्य़ाचा सपाटाच लावला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची भावना निर्माण झाली आहे. कंत्राटदाराच्या कामामुळे या आधी वीज पुरवठा खंडीत होणे, मुळापासून झाड उखडवणे असे प्रकार घडले आहेत. शुक्रवारी तर त्याही पुढे जाऊन इमारत क्रमांक २४० च्या ऐ विंगकडील संपूर्ण गेट आणि कठडाच उखडून टाकण्यात आला आहे.
गेट तोडल्यानंतर तेथील विद्युत प्रवाह तोडण्याचेही कष्ट कंत्राटदाराने घेतले नाही. गेटवर वीजेचे दिवे असल्याने त्याच्या वाहिन्या गटाराच्या पाण्यात पडल्या आहेत. अखेर इमारतीच्या व्यवस्थापनानेच दुर्घटना घडू नये म्हणून प्रवाह बंद केला.
भूमिगत गटारांचे स्लॅब तोडून पुन्हा नव्याने ते बांधण्याचे काम येथे सुरू झाले आहे. हे स्लॅब तोडण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत आहे. जेसीबीचा चालक बिनधास्तपणे मशीन लावून स्लॅब तोडत आहे. त्यामुळे जमीनीखालून गेलेल्या विद्युत वाहिन्या तुटून वीजपुरवठा बंद पडण्या
च्या घटना घडल्या आहेत. येथील अनेक वृक्षही उन्मळून पडण्याच्या स्थितीत आहेत. आतापर्यंत चिंचेचे एक झाड तोडण्यात आले आहे. पालिकेने दुर्लक्ष केल्यास इतर वृक्ष तोडण्याची वेळ येऊ शकते.
इमारत क्रमांक २४० मध्ये तळमाळ्यावर विकास हायस्कूलची शाळा भरते. तरीही कंत्राटदाराने बिनधास्तपणे गेटवरच जेसीबी मशीनचा प्रहार केला. त्यामुळे अख्खा गेटच उखडला गेला आहे. याआधी इमारत क्रमांक २१८चा गेट ही तोडण्यात आला होता. आता पुन्हा असाच प्रकार घडला आहे. आम्ही पुन्हा बांधून देऊ, असे आश्वासन कंत्राटदाराने दिले आहे.
पथदिवेही बंद
मागील दोन आठवड्यांपासून कामगार कल्याण भवन, पालिकेचे महात्मा फुले रुग्णालय या परिसरातील पथदिवेही बंद आहेत. दिवे बंद असल्याने येथे अंधार पसरत आहे. तरिही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.