Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याबाबत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आभासी चित्र उभे केले जात असल्याचे आरोप प्रसारमाध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून करण्यात आले आहेत. सदर आरोप हे पूर्णपणे निराधार असून त्याचा महानगरपालिका प्रशासन स्पष्टपणे इन्कार करीत आहे.
जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (आयसीएमआर) यांनी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच बृहन्मुंबई महानगरपालिका कोविड चाचण्या व कोविड मृत्युंच्या नोंदी करीत आहे. कोविड व्यवस्थापनामध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेले अविरत प्रयत्न, त्याचे प्रत्यक्ष दिसत असलेले सकारात्मक परिणाम मुंबईसंबंधी आकडेवारीमध्ये उमटत आहेत. कोविड संसर्गाची स्थिती टप्प्या-टप्प्याने नियंत्रणात आणून ‘मिशन झिरो’ साध्य करण्याचे लक्ष्य प्रशासनाने समोर ठेवले आहे. यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींसह मुंबईकरांचे देखील सहकार्य लाभत असून त्याचा एकत्रित परिणाम म्हणून संसर्ग नियंत्रणात येत आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील मुंबई मॉडेलचे कौतुक करीत त्याचे अनुसरण करण्याचे निर्देश एका सुनावणीप्रसंगी नुकतेच दिले. त्यापूर्वी जागतिक बँकेसह जागतिक आरोग्य संघटनेने देखील मुंबईतील कोविड व्यवस्थापनाचे जगजाहीर कौतुक केले, हे सर्वश्रुत आहे. असे असतानाही प्रसारमाध्यमांतून व समाजमाध्यमांतून करण्यात येत असलेल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड मृत्युंची नेमकी आकडेवारी उजेडात आणली जात नाही, कोविड चाचण्यांच्या प्रकारांशी तडजोडी करुन संसर्गाचा दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे केले जाते.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नमूद करण्यात येते की, हे आरोप निराधार असून ते वस्तुस्थितीशी विसंगत आहेत. त्याबाबत पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
अ) कोविड मृत्युंची आकडेवारीः कोविड बाधित मृत्युंबाबत स्पष्ट करावेसे वाटते की, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही किंवा त्याच्याशी छेडछाड केली जात नाही. दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून कोविड मृत्युंचे आकडे जाहीर केले जातातच. कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर संकेतस्थळावर देखील त्याची नोंद असते. सरकारकडेही नियमितपणे त्याची माहिती सादर करण्यात येते. त्यामुळे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आरोप हा बिनबुडाचा ठरतो.
कोविड मृत्यू व कोविड इतर (covid other) कारणांनी मृत्यू हे निकष महानगरपालिका प्रशासनाने स्वतः निश्चित केलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) व केंद्र सरकार यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच कोविड रुग्णांच्या मृत्युंची नोंद करण्यात येते. त्याबाबतची सर्व माहिती नोंदवून जतन करण्याची कार्यवाही नियिमतपणे केली जाते. त्यांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. त्यानुसारच मृत्यूचे कारण (Cause of Death) व इतर माहिती नोंदवली जाते आहे.
कोविडमुळे अथवा कोविड बाधेसह इतर कारणांनी किंवा कोविड संशयित असतानाही मृत्यू ओढवल्यास अशा सर्व प्रसंगांत कोविड प्रोटोकॉल पाळूनच अंत्यविधी केले जातात. त्याबद्दलचे सर्व स्पष्ट निर्देश रुग्णालयांसह सर्व स्मशानभूमींना देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रसंगी नियमावलीनुसार सर्व प्रक्रिया करून, निर्जंतुकीकरण करून अंत्यविधी केले जातात. या सर्व कार्यवाहीमध्ये कोणतीही कसूर केली जात नाही.
कोरोना बाधित मृतांची आकडेवारी देताना त्यासोबत त्यांना असलेल्या इतर आजारांचा ही उल्लेख केला जातो. याचा अर्थ कोविड हे कारण झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गृहीत धरला जाऊ नये. हे विश्लेषण दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून देखील पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामागचा हेतू इतर आजारांचे निमित्त पुढे करणे असा होत नाही. उलट संबंधित इतर आजार असलेल्या नागरिकांनी आपापल्या परीने योग्य काळजी घ्यावी, नियमितपणे औषधे घ्यावीत, असे जाहीर आवाहन करून संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
कोविड मृत्युंच्या नोंदी कमी दाखविणे ही स्वतःचीच फसगत करण्यासारखे आहे, त्यातून प्रत्यक्ष डोळ्यांदेखत दिसणारी स्थिती बदलता येत नाही, याचे भान प्रशासनाला आहे. तसेच अकारण मृत्युचे आकडे वाढवून जनतेच्या मनात अनाठायी भीती निर्माण करणे, हे देखील सर्वस्वी चुकीचे आहे. यामुळे निकषांप्रमाणेच योग्य ती नोंद मृत्यू प्रकरणांमध्ये केली जाते, याबद्दल नागरिकांनी खात्री बाळगावी. त्यामुळे कोविड इतर (covid other) कारणांची नोंद वाढवून प्रत्यक्ष कोविड मृत्युंची नोंद कमी करण्यात येत असल्याचा आक्षेप पूर्णपणे निराधार आहे.
ब) कोविड संसर्ग मृत्यू दरः मुंबईतील कोविड संसर्गाचा दर हा लपविण्याचा किंवा कमी दाखवण्याचा कोणताही प्रयत्न महानगरपालिका प्रशासनाने केलेला नाही. दैनंदिन चाचण्या, बाधितांची संख्या, मृत्युंची संख्या हे सर्व कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सरकारकडे नियमितपणे सर्व माहिती दिली जाते. जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये कोविड संसर्ग मृत्यू दर हा सरासरी ०.७१ टक्के इतका आहे. या कालावधीतील कोविड इतर (covid other) झालेले इतर मृत्यू जरी यात जमेस धरले तरी हा दर ०.९८ टक्के इतका म्हणजेच १ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. सद्यस्थितीत जागतिक कोविड मृत्यू दर हा २.११ टक्के इतका तर भारताचा मृत्यू दर हा १.१२ टक्के इतका आहे. म्हणजेच या दोन्ही तुलनांमध्ये मुंबईतील कोविड संसर्ग मृत्यू दर हा कमी आहे.
क) कोविड चाचण्याः भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्र सरकार यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसारच मुंबईत कोविडसंबंधी चाचण्या पार पाडल्या जातात. कोविडची लक्षणे असलेले रुग्ण, कोविड बाधितांचे अतिजोखमीचे सहवासित (हायरिस्क कॉन्टॅक्ट), प्राणवायू पातळी कमी दर्शवणारे ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजार व सहव्याधी असलेले नागरिक अशा सर्वांच्या चाचण्या करण्यात येतात. तसेच रेल्वे स्थानक, विमानतळ, व्यापारी संकुल, बाजारपेठा, फेरीवाले क्षेत्र अशा सार्वजनिक जागी देखील महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर चाचण्या करुन बाधितांना वेळीच शोधून विलगीकरणाची कार्यवाही केली आहे.
मुंबईतील चाचण्यांची संख्या मुळीच कमी झालेली नाही. किंबहुना चाचण्यांची संख्या वर्षभरापासून सातत्याने वाढते आहे. २०२१ या वर्षाचा विचार केला तर जानेवारीमध्ये ४ लाख ४४ हजार ७८३, फेब्रुवारीमध्ये ४ लाख ७६ हजार २५४, मार्च ८ लाख ३८ हजार २१०, एप्रिलमध्ये १३ लाख ३१ हजार ६९७ इतक्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. मे २०२० ते ७ मे २०२१ या वर्षभराच्या कालावधीमध्ये मुंबईत एकूण ५९ लाख १८ हजार ८१५ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या जितकी अधिक तितके अधिकाधिक बाधितांना शोधणे अधिक सोपे, हे सूत्र लक्षात ठेवून चाचण्यांचा वेग कायम ठेवण्यात आला आहे.
एकूण, चाचण्यांमध्ये ऍण्टीजेन चाचण्यांचे प्रमाण अधिक आणि आरटीपीसीआरचे प्रमाण कमी राखून संसर्गाची वस्तुस्थिती दडवली जात असल्याचा आरोपही बरोबर नाही. आरटीपीआर आणि ऍण्टीजेन या चाचण्यांची विश्वासार्हता सरकारनेच प्रमाणित केलेली आहे. यापैकी कोणती चाचणी कधी करायची, हे निकषही आयसीएमआर व सरकारनेच ठरवून दिलेले आहेत. त्यानुसारच या चाचण्या केल्या जातात.
यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की, मुंबई महानगरातील चाचण्यांचा विचार करताना या महानगराची वैशिष्ट्ये पण लक्षात घ्यावी लागतात. या महानगराचे क्षेत्र अवाढव्य आहे. या महानगरामध्ये शेजारील शहरांमधून, राज्यातील इतर भागांतून तसेच इतर राज्यांतूनही ये-जा करणारे नागरिक असतात. रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास आलेली लोकसंख्या लक्षणीय आहे. ज्यावेळी असे नागरिक एका परिसरातून दुसऱया ठिकाणी ये-जा करतात, त्यावेळी त्यांची कोविड चाचणी करुन तातडीने निष्कर्ष मिळणे क्रमप्राप्त असते. त्यासाठी ऍण्टीजेन चाचणीच महत्त्वाची ठरते. अर्थात ऍण्टीजेन चाचणीमध्ये निगेटिव्ह अहवाल मिळालेल्या परंतु लक्षणे दिसत असलेल्यांची पुढे जाऊन आरटीपीसीआर चाचणी केली जातेच. तोवर प्राथमिक निष्कर्ष हाती असणे आवश्यक असते. अन्यथा कोविड व्यवस्थापनामध्ये अडथळे उभे राहू शकतात. वैद्यकीय निकषांनुसार तपासणी करून टेस्टिंग किटचा प्रभावी व सुयोग्य वापर करण्यात येत आहे. आयसीएमआर आणि सरकार यांच्या निर्देशानुसारच ७०:३० या प्रमाणात आरटीपीसीआर व ऍण्टीजेन चाचणी केली जात आहे. त्यामागे शास्त्रीय आधार आहे. थोडक्यात, आरटीपीसीआर व ऍण्टीजेन चाचण्या यांचा योग्य मेळ साधूनच महानगरपालिका प्रशासन कार्यवाही करत आहे.
टाळेबंदी शिथील झाल्यानंतरच्या कालावधीत नागरिकांची गतिशीलता, दळणवळण वाढून व्यवहार पूर्ववत होवू लागले, तेव्हा सार्वजनिक जागांवर कोविडचा फैलाव होवू नये म्हणून ऍण्टीजेन चाचण्या करुन तातडीने निकाल प्राप्त करणे आवश्यक होते. असे असले तरी, ऍन्टीजेन चाचण्यांचा वापर व्यापक प्रमाणावर होवू लागला तेव्हापासूनचा कालावधी लक्षात घेतला तरी, आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण महानगरपालिकेने सातत्याने वाढवत नेले आहे, ही बाब येथे लक्षात घेतली पाहिजे.
एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची टक्केवारी पाहता, डिसेंबर २०२० मध्ये ५०.३६ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ६५.३१ टक्के, फेब्रुवारी २०२१ मध्ये ७४.२३ टक्के, मार्च २०२१ मध्ये ६७.२४ टक्के, एप्रिल २०२१ मध्ये ६७.८७ टक्के इतके आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण आहे.
आता या आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आढळलेल्या बाधितांची टक्केवारी पाहता डिसेंबर २०२० मध्ये ७.१२ टक्के, जानेवारी २०२१ मध्ये ५.३९ टक्के, फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.३३ टक्के, मार्च २०२१ मध्ये १५.४८ टक्के, एप्रिल २०२१ मध्ये २३.४३ टक्के इतके बाधित आढळले. दुसऱया लाटेची देशभरातील तीव्रता पाहता, आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण मुंबईत सातत्याने वाढवूनही बाधितांची संख्या अथवा संसर्गाचे प्रमाण त्या तुलनेने मुंबईत कमीच आहे. ही वस्तुस्थिती असताना महानगरपालिका प्रशासनाने त्यात लपवाछपवी करण्याचे कारणच उरत नाही.
(ड) कोविड व्यवस्थापन पूर्णपणे पारदर्शकः दुसरी लाट आल्यापासूनचा कालावधी लक्षात घेता, कोविड बाधितांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. प्रतिबंध क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणी, ब्रेक दी चेन मोहीमेअंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध याचा सकारात्मक परिणाम मुंबईमध्ये दिसतो आहे. त्यातून संसर्गाला रोखण्यासाठी प्रभावी कामकाज व व्यवस्थापन होत आहे.
कोविडविषयक नियमांचे पालन करण्यासाठी जनतेमध्ये व्यापक जनजागृती महानगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणूक (कोविड ऍप्रोप्रिएट बिएव्हीयर) राखण्याचे प्रमाण मुंबईमध्ये लक्षणीय आहे. मास्कचा उपयोग, निर्जंतुकीकरण द्रव्य (सॅनिटायझर) चा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन मुंबईकर तुलनेने चांगल्या रितीने करतात. नियमभंग करणाऱयांवर कारवाई करुन दंड आकारण्याची मोहीमही प्रशासनाने सातत्याने राबवली आहे. मुंबईत माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेनंतर माझा मास्क-माझी सुरक्षा मोहीम राबविली गेली आहे. याचा परिणाम म्हणूनही संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली आहे. या दैनंदिन प्रसिद्धी विषयक कामांसाठी कोणतीही जनसंपर्क/जाहिरात संस्था महानगरपालिकेने नेमलेली नाही. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील जनसंपर्क तसेच आरोग्य खात्याच्या माध्यमातून दैनंदिन प्रसिद्धी तसेच जनजागृतीची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे पीआर संस्था नेमल्याचा आरोप सपशेल चुकीचा आहे.
मुंबई महानगरात ख्यातनाम, प्रसिद्ध असे अनेक उद्योजक, विचारवंत, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते वास्तव्यास आहेत. मोठे कॉर्पोरेट विश्व मुंबईत आहे. कोविड कालावधील आपापले सामाजिक कर्तव्य व योगदान म्हणून पुढे येऊन यातील बहुतेकांनी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना आपापल्या परिने हातभार लावला आहे. तसेच जनजागृतीसाठी मदत केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना कमी लेखणे किंवा त्यास बनवाबनवी संबोधणे उचित वाटत नाही.
कोरोना विषाणू संक्रमणाशी बृहन्मुंबई महानगरपालिका करत असलेले दोन हात हे एक युद्धच आहे. या प्रयत्नांमध्ये सर्वांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, अशी पुनश्च एकदा सर्वांना विनंती आहे.