मुंबई : जगभरातून येणार्या पर्यटकांना आणि छायाचित्रकारांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तसेच महानगरपालिका मुख्यालय व इतर पुरातन वास्तुंचे छायाचित्र आता एका जागेवरून विविध अंशांत काढता येणार आहेत. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या ‘दर्शनी गॅलरी’ चे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केले. महापालिका मुख्यालय, फिरोजशहा मेहता पुतळयाजवळ येथे झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांवेळी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “हा सेल्फी पॉइंट नसून ‘दर्शनी गॅलरी’ आहे. देश – विदेशातून येणाऱया पर्यटकांना पुरातन वास्तूंचे अवलोकन करणे तसेच त्यांची छायाचित्रे काढणे सुलभ व्हावे यासाठी ही ‘दर्शनी गॅलरी’ तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत अल्प कालावधीत महापालिकेने ही ‘दर्शनी गॅलरी’ तयार केली आहे. यासाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.”
पर्यावरण मंत्री रामदास कदम, स्थानिक आमदार राज पुरोहित, उप महापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा सिंधू मसुरकर, माजी महापौर तथा नगरसेविका श्रध्दा जाधव, स्नेहल आंबेकर, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, उप आयुक्त (परिमंडळ – १) सुहास करवंदे, ऐ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी यावेळी उपस्थित होते.