मुंबई, (निसार अली) : ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना सरकारने आर्थिक करावी, अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केली आहे.
दिनांक 3 ते 7 डिसेंबर दरम्यान आलेल्या चक्रीवादळाने मच्छीमारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. मत्स्य हंगाम सुरू असताना वादळ सुरू झाले. याने मत्स्य उत्पादनावर परिणाम झाला.
वादळ काळात सिंधुदुर्गात एक नौका बुडाली. वसई येथील सहारा नौका बेपत्ता आहे. वसई येथील अजून काही नौका दमण, गुजरात येथील किनाऱ्यावर आश्रयाला आहेत. राज्य सरकारकडून ओखी वादळाची सूचना मिळताच जाळ्या आणि मासेमारी सामुग्री समुद्रात सोडून नौका किनाऱ्यावर संरक्षणासाठी गेल्या होत्या. आता मासेमारीसाठी आवश्यक सामुग्री मच्छीमारांकडे नाही.
वादळामुळे नुकसानग्रस्त मच्छीमार, अवेळी पावसाने सुख्या मासळीचेही नुकसान झालेले व्यवसायिक, यांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
आपत्कालीन योजना राज्य सरकारने तयार करावी, ओखी वादळ ग्रस्त मच्छीमारांना केरळ व तामिळनाडू सरकारने आर्थिक मदत केली त्या अनुषंगाने राज्यातील मच्छीमारांना करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
अवेळी वादळे, वादळी वारे अशा अनेक प्रकारच्या नुकसानीची भरपाई तात्काळ मच्छीमारांना मिळण्याकरिता कोणतीही उपाय योजना नाही, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.
राज्य सरकारने मत्स्य व्यवसाय खात्याचे प्रधान सचिव अथवा आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली व सदर योजनेअंतर्गत मच्छीमारांना 100 कोटींची मदत
तात्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केली आहे .