मुंबई : जुहू चौपाटीवर बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने सुशोभित विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यानंतर जुहू चौपाटीवर फेरफटका मारण्यासाठी दररोज येणाऱ्या मुंबईकर नागरिकांच्या भेडसावणाऱ्या समस्यां व तक्रारी जाणून घेण्यासाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बुधवारी जुहू चौपाटीची पहाणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच चौपाटीवरील साफसफाई कामाचे निरिक्षण केले.
महापालिकेने केलेल्या कामाच्या ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेचे नामफलक लावण्याची संबधित अधिकाऱ्यांना सूचना केली. त्यासोबतच याठिकाणी येणाऱ्या नागरिकांशी दिर्घ चर्चा करुन, त्यांची मते जाणून घेतली. तसेच यापुढील काळात आणखी सोयीसुविधा देणार असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शनिवार व रविवारला वाढती पर्यटकांची संख्या लक्षात घेता, याठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यासोबतच कचरा संकलनासाठी अतिरिक्त कचराकुंडी ठेवावी, अशी सूचना महापौरांनी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. त्यासोबतच अनवाणी चालणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काचसारख्या वस्तुं चौपाटीवरुन नियमीतपणे संकलीत केल्या जाव्यात, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. याप्रसंगी मा नगरसेवक सुभाष कांता सावंत व मनोहर पांचाळ हे उपस्थित होते.















