मुंबई : दिव्यांग व्यक्तीसुध्दा समाजातील महत्वपूर्ण घटक असून दिव्यांगाप्रती नागरिकांची संवेदना वाढली तरच त्यांच्या समस्या सुटण्यास हातभार लागेल. यामुळे त्यांच्याबद्दल नागरिकांची संवेदना वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांगाचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी २० दिव्यांग व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
बृहन्मुंबई महानगरपालिका दिव्यांगासाठी जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करुन दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी आपल्या दिव्यांग मित्रांना महापालिकेच्या योजनांची माहिती द्यावी, जेणेकरुन जास्तीत जास्त दिव्यांगाना या योजनांचा लाभ मिळणे शक्य होईल, असे महापौरांनी सांगितले. तसेच आपआपल्या प्रभागातील दिव्यांगाना नगरसेवक निधीतून काही योजनांचा लाभ देता येईल, यासाठी पाठपुरावा करणार ते म्हणाले. महानगर पालिका दिव्यांगासाठी विविध योजना राबवित असते. अशाप्रकारच्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व्हायला हवा, अशी सूचना सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर यांनी केली.