मुंबई : कुलाबा ते सिप्झ दरम्यान आरे कॉलनीतील मेट्रो ३ कारशेडच्या कामासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार असून यापूर्वी झालेले वृक्षपुर्नरोपण पाहणीनंतर अयशस्वी ठरत असल्याचे निर्देशनास आल्याने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात येणाऱया वृक्षांची कत्तल थांबवावी अशी मागणी मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.
महाडेश्वर यांनी आज महापालिका गटनेते तसेच वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांसमवेत आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.
याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, विरोधी पक्षनेते रवि राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बाजार व उद्याने समिती अध्यक्षा सान्वी तांडेल, नगरसेवक कप्तान मलिक, जगदिश अमिन, नगरसेविका प्रिती पाटणकर, स्मिता गावकर, सुवर्णा करंजे, रेखा रामवंशी, के-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मेट्रो ३ चे अधिकारी उपस्थित होते.
महापौर महाडेश्वर यांनी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडलगतच्या सारीफत नगर येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. याठिकाणच्या वृक्षांबाबतची गत सहा महिन्यापूर्वीची स्थिती व आताच्या वृक्षांबाबतची स्थिती याची गुगल इमेजवरुन माहिती घेऊन ती सादर करण्याची सूचना महापौरांनी यावेळी मेट्रो ३ चे अधिकारी यांना केली. त्याचप्रमाणे तोडण्यात येणाऱया वृक्षांची संख्या, पुर्नरोपीत करण्यात येणाऱया वृक्षांची संख्या व कोणत्या जातीच्या वृक्षांची मोठया प्रमाणावर तोड होणार आहे याचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना केली.
मेट्रो ३ च्या कामासाठी एकूण एक हजार दोनशे सत्ताऐंशी हेक्टर जागा लागणार असून तेहत्तीस हेक्टरवर मेट्रो कारशेड उभारणार असल्याची माहिती मेट्रो ३ च्या अधिकाऱयांनी सादरीकरणाव्दारे यावेळी उपस्थित मान्यवरांना दिली. त्यासोबतच एकूण दोन हजार सहाशे पासष्ट वृक्ष तोडण्यात येणार असून वनविभागासोबत झालेल्या करारान्वये पुर्नरोपीत केलेल्या वृक्षांचे सात वर्षापर्यंत संवर्धन करण्याची जबाबदारी ही वनविभागाला देण्यात आल्याची माहिती मेट्रो ३ च्या अधिकाऱयांनी यावेळी महापौरांना दिली.
त्यानंतर महापौरांनी शितलामाता परिसरातील पुर्नरोपीत करण्यात आलेल्या वृक्षांची पाहणी केली. यावेळी ही वृक्ष मोठया प्रमाणात मृत पावल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मेट्रो ३ च्या अधिकाऱयांचे याकडे होणारे दुर्लक्ष व पुर्नरोपीत करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान उपलब्ध का केले नाही ? याचा जाब मेट्रो ३ च्या अधिकाऱयांना यावेळी विचारला. यामुळे मुंबईचे पर्यावरणीयदृष्टया मोठे नुकसान होणार असून वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड, मिथेन, सल्फरचे वाढते प्रमाण हे भावी पिढीचे मोठे नुकसान करणार असल्याची चिंता त्यांनी मेट्रो ३ च्या अधिकाऱयांकडे व्यक्त केली