
रत्नागिरी : चिपळूणमधील मातृभूमी कंपनीकडून झालेल्या फसवणुकीची व्याप्ती वाढली आहे. आतापर्यंत १ हजार ४०४ गुंतवणुकदारांची २ कोटी ३३ लाख ९७ हजारांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. मातृभुमीने दहा कंपन्यांमार्फत व्यवहार सुरू ठेवल्याचेही तपासात पुढे आहे. या कंपनीची राज्यात पंधरा कार्यालये आहेत. गुन्हा दाखल असलेल्या चौघांपैकी दोघेजण अद्याप फरार आहेत.
मातृभूमी कंपनीविरोधात अरविंद सदानंद मोरे (४४, रा. जेलरोड रत्नागिरी) यांनी फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीनुसार कंपनीचे संचालक प्रदिप गर्ग, संजय हेमंत बिश्वास, मिलिंद अनंत जाधव आणि विनोदभाई पटेल या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मातृभूमी कंपनीचे चिपळूण येथील कार्यालय २००९ पासून सुरू आहे. कंपनीच्या पॉलिसीमध्ये एजंटने गुंतवणुक केल्यास १८ टक्के तर गुंतवणुकदाराची गुंतवणुक आणल्यास पाच टक्के व्याज यासह दरमहा मेडीक्लेम पॉलिसी, अपघात झाल्यास, मृत्यु झाल्यास रक्कम देण्याचे आमिष कंपनीकडून दाखवण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यापासून मातृभूमी कंपनीकडून फसवणुक झाल्याच्या १ हजार ४०४ गुंतवणुकदारांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारदारांची २ कोटी ३३ लाख ९७ हजारांची फसवणुक झाल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल असलेल्या चौघा संचालकांपैकी हेमंत बिश्वास आणि विनोदभाई पटेल हे दोघेजण सुरत येथे न्यायालयीन कोठडीत असून उर्वरित दोघेजण फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
मातृभूमी कंपनीने दहा कंपन्यांमार्फत व्यवहार सुरू ठेवले होते. या कंपनीची बोयसर, बोरीवली, चिपळूण, डहाणु, हिंगोली, कोल्हापूर, कुडाळ, लातुर, मंडणगड, नाशिक, उस्मानाबाद, पंढरपुर, पेण, सांगली आणि पुणे या पंधरा ठिकाणी कार्यालय सुरू होती. रत्नागिरीत ४९ एंजटसमार्फत गुंतवणुकदार गोळा करण्याचे काम सुरू होते. या घोटाळयाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी चिपळूण पोलीस स्थानक येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे.















