मुंबई : नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतून ११ लाखांहून अधिक मतदारांची नावे गायब असल्याची बाब समोर आली होती. परंतु, त्या प्रमाणात मतदार यादीच्या तक्रारीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारिंचे फक्त ६३ अर्ज प्राप्त झाले, माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे.
२०१७ च्या पालिका निवडणूकीत मतदार यादीबाबत किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात विचारले होते. महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाने त्यांना माहिती दिली.
वर्ष २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या अनुक्रमे १,०२, ८६, ५७९ आणि ९१, ८०, ५५५ अशी आहे. वर्ष २०१२ च्या तुलनेत वर्ष २०१७ च्या पालिका निवडणुकीत ११ लाख ६ हजार २४ अशी मतदारांच्या संख्येत तफावत होती. असे असताना निवडणूक मतदार यादीच्या तक्रारीचे फक्त ६३ अर्ज प्राप्त झाले. याचा अर्थ मतदार आपल्या अधिकाराला घेऊन गंभीर नाही आहेत, हे स्पष्ट होते, असे गलगली यांनी सांगितले.