मुंबई, : नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदविणे सोपे जावे यासाठी भारत निवडणूक आयोग १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत विशेष मोहिम राबविणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्जही देण्यात येणार आहे, अशी माहिती उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी आज दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मोहीमेसंदर्भात मंत्रालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत वळवी यांनी माहिती दिली. यावेळी अवर सचिव शिरीष मोहोड यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.
वळवी म्हणाले की, राज्यात १८ ते १९ या वयोगटातील १२ लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी तसेच युवा वर्गात मतदानासंदर्भात प्रबोधन व्हावे या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जासोबतच नमुना – ६ सुद्धा घेण्यात येणार आहे. यामुळे तरुण मतदारांना सरकारी कार्यालयात जाऊन मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
ज्या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांकडून भविष्यातील मतदार म्हणून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात येणार आहे. याचबरोबर प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये जाऊनही नाव नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहीमेमुळे तरुणांना तसेच नागरिकांना मतदार नाव नोंदणी करणे सहजसोपे होणार असल्याचे वळवी यांनी सांगितले.