ठाणे : जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे काम तसेच नवीन मतदार नोंदणी याबाबतीत नुकताच विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर, मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी देखील उपस्थित होते.01 सप्टेंबर, 2018 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात आलेली असून 31 ऑक्टोबरपर्यंत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भात जागृती निर्माण करुन मतदार यादी अद्ययावत करण्याच्या दृष्टीने नवीन मतदारांची नावे नोंदणी करण्यासाठी तसेच मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्याच्या सुचना विभागीय आयुक्त यांनी दिल्या.18 विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महानगरपालिकेतील प्रभाग कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे फॉर्मचे वाटप करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच 18 विधानसभा मतदार संघामार्फत पदनिर्देशित ठिकाणे (ज्या इमारतीमध्ये मतदान केंद्र आहेत तेथे) निश्चित करण्यात आलेली असून सदर ठिकाणी फॉर्मचे वाटप करणे व स्वीकारणे यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांनी प्रत्येक पदनिर्देशित ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्या शाळेतील शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. सर्व मतदारांनी विशेषत: 18 ते 21 वयोगटातील तरूणांनी, नवविवाहीत महिलांनी तसेच दि. 01.01.2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी व दि. 01.01.2019 रोजी 18 वर्ष पूर्ण होऊ घातलेल्या भावी मतदारांनी दि. 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत सदर ठिकाणी जाऊन आपले नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करावी, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आवाहन केले.तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष/सचिव यांनी मतदारांचे नावाची नोंद करण्यासाठी कॅम्प आयोजन करावयाचे असल्यास त्यांनी संबंधित विधानसभा मतदार संघातील अधिकारी/कर्मचारी यांचेशी संपर्क साधून विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात यावे व जास्तीत जास्त मतदारांच्या नावांची नोंद मतदार यादीत करावे असे देखील आवाहन करण्यात आले.