
डोंबिवली : मराठी नवं वर्ष स्वागत यात्रा डोंबिवली, कल्याण ठाणे सह महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध शहरात या निमित्त स्वागत यात्रा आयोजित केल्या जातात व सर्व वयोगटाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. ठाणे जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी मतदान असल्याने या निमित्त नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्याची सूचना स्वागत यात्रेचे प्रणेते आबासाहेब पटवारी यांनी केली.
शनिवार 6 एप्रिल रोजी गुढी पाडवा असून मराठी नवं वर्षाची सुरवात होते. यावर्षी प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर गुढी पाडवा आहे याचा फायदा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले पाहिजे असे मत पटवारी यांनी व्यक्त केले आहे.
कल्याण डोंबिवलीत मतदान जेमतेम 40 टक्के होत असल्याने जन जागृतीची गरज आहे. निवडणूक आयोग सध्या मोठ्या प्रमाणात मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. याबाबत आबासाहेब पटवारी म्हणाले डोंबिवलीतून प्रथम स्वागत यात्रा सुरू झाली व संपूर्ण महाराष्ट्राने अनुकरण केले. आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन स्वागत यात्रेत मतदारांना आवाहन करावे अशी सूचना त्यांनी केली व तसे पत्र गणेश मंदिर संस्थानाला देणार असल्याचे सांगितले. पटवारी यांच्या आवाहनाला जर येथील मतदारांनी प्रतिसाद दिला तर डोंबिवली गणेश मंदिरचे या निमित्ताने एक वेगळे व अनोखे कार्य पुन्हा जनतेसमोर येणार आहे.
















