मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत या निवडणुकांच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या पंधरा जिल्हा परिषदांकरिता त्यांच्या कार्यक्षेत्रात व त्याअंतर्गत १६५ पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी गुरुवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यातील गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या आठ पंचायत समितीपुरती सदरची सुट्टी मर्यादित राहील.
त्याचप्रमाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर, अमरावती व गडचिरोली या अकरा जिल्हा परिषदांकरिता त्यांचा कार्यक्षेत्रामध्ये व त्याअंतर्गत ११८ पंचायत समित्यांच्या क्षेत्रामध्ये तसेच मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर या दहा महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी मंगळवार, दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यातील गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार पंचायत समिती क्षेत्रापुरती सदरची सुट्टी मर्यादित राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.